भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात मंत्री म्हणून समन्वयाने काम करावे…

आम. प्रमोद जठार: मालवणात कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत..

⚡मालवण ता.०७-:
देशात आता भाजपाची एका रेषेतील सत्ता आली आहे, पार्लमेंट टू पंचायत पर्यंत भाजपची सत्ता आहे. राजकीय पक्ष कधी युतीत चालत नाही, तो शतप्रतिशतच असतो, म्हणून भाजप पक्षावर आणि आपल्या नेत्यांवर निष्ठा ठेवून कार्यकर्त्यांनी काम समन्वयाने करावे, आपापल्या भागाचा विकास साधण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी स्वतः मंत्री बनून आपापल्या भागात काम करावे, असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी मालवण येथे बोलताना केले.

विधानपरिषदेचे भाजपचे नवनियुक्त आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यात आज सायंकाळी उशिरा मालवणला भेट दिली असता मालवण भाजप कार्यालय येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून आम. जठार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फाटाक्यांची आतषबाजी करत, औक्षण करत आणि पुष्पहार घालून आम. जठार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते विलास हडकर, नगरसेवक मंदार केणी, रविकिरण तोरसकर, ललित चव्हाण पंकज सादये, महेश मांजरेकर, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, जि. प. सदस्य दीपक सुर्वे, शिल्पा खोत, महिमा मयेकर, सेजल परब, सन्मेष परब, यतीन खोत, राजू परुळेकर, सुरेश बापर्डेकर, अवि सामंत, भाई कासवकर, रश्मी लुडबे, समृध्दी आसोलकर, सुमित सावंत, पूजा सरकारे, अमृता फाटक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रमोद जठार म्हणाले, अनेक नेत्यांच्या मागणीप्रमाणे मला आमदार करण्याचा निर्णय घेतला गेला त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. आमदार म्हणून मी कार्यकर्त्यांसाठी नेहमी उपलब्ध आहे, भाजपचा विचार मानून या विचार प्रवाहात आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा निष्ठावान होतो, नग तो कोणत्याही पक्षातून आलेला असो. सगळे नदी नाले, ओढे एकत्र येऊन समुद्राला मिळतात, त्यावर समुद्राचा काही आक्षेप नसतो, तसाच भाजप हा समुद्र आहे. कार्यकर्त्यांनी मनातील पण, किंतु परंतु काढून टाकावेत. भाजप पक्ष म्हणजे आपण हजारो वर्षाच्या भारतीय व सनातनी परंपरेचे वारस आहोत. पद ही क्षणिक गोष्ट आहे, त्या पलिकडे जाऊन पक्षाच्या विचाराकडे बघून काम कारा. भाजप पक्ष हा शेवटच्या जनते पर्यंत जाण्यासाठी पक्ष आहे, पक्ष हे साधन आहे, साध्य नाही, भाजपकडे देशात एका रेषेतील सत्ता आहे, त्यामुळे आता विकास दूर नाही, कार्यकर्त्यांनी आपापल्या भागाचा विकास साधावा, विकासाचा बॅकलॉग भरून काढा, जनतेला समस्यांचे निवारण करून द्या सोल्युशन द्या, त्यासाठी समन्वय साधणे हे माझे काम आहे, असेही आम. जठार म्हणाले.

यावेळी विलास हडकर म्हणाले, भाजप ही विचार सोडणार नाही अशा कार्यकर्त्यांची पार्टी आहे, या पक्षातील कार्यकर्ता संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. यातूनच आम. प्रमोद जठार यांच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते घडले असून आम. जठार हे केवळ आमदार पदावर थांबणार नाही, नामदार पण होतील, असेही ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले आम. जठार यांनी भाजप पक्षावर निष्ठा ठेवून काम केले आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाने, कार्याने सर्वजण प्रेरित आहेत, आम. जठार यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी शिकता आल्या, असेही ते म्हणाले.

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यापूर्वी माजी आमदार असलेल्या प्रमोद जठार यांना भाजप कडून न्याय मिळाला पाहिजे असे वाटत होते, पक्षाने जठार यांना आमदार करून प्रामाणिक कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे, असेही ते म्हणाले. नगरसेवक मंदार केणी म्हणाले, आमदार प्रमोद जठार यांच्या रुपाने स्वाभिमानी कार्यकर्त्यांना आशेचा किरण दिसलेला आहे, जठार यांच्यामुळे जनतेची कामे होण्यास मदत होईल, आम. जठार कार्यकर्त्यांना न्याय देतील, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले.

You cannot copy content of this page