सावंतवाडीतील देवदूतांची धाव ; गोवा आणि ओरोसमध्ये रक्तदान करून वाचवले रुग्णांचे प्राण…

⚡सावंतवाडी ता.०४-: रक्तदानासारखे श्रेष्ठ दान दुसरे नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि रक्तदात्यांनी आणून दिला आहे. गोवा-बांबोळी, ओरोस-सिंधुदुर्गनगरी आणि पर्वरी येथील रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या तीन गरजू रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासल्यानंतर, सावंतवाडीतील तरुणांनी धाव घेत रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडवले.

गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेले रुग्ण अविनाश चोरगे यांना बी पॉझिटिव्ह रक्ताची तातडीने आवश्यकता होती. ही माहिती मिळताच युवा रक्तदाता संघटनेचे रक्तादाते सावंतवाडीतून वैभव दळवी, संकेत माळी आणि दर्शन सावंत यांनी तातडीने गोवा बांबोळी गाठले आणि तेथील रक्तपेढीत रक्तदान करून रुग्णाला जीवदान दिले. तसेच जी.टी. राणे रुग्णालयात भरती असलेले सावंतवाडीचे रुग्ण जॉन डिसोझा यांना ओ निगेटिव्ह या अत्यंत दुर्मिळ रक्ताची गरज होती. रक्ताचा तुटवडा असतानाच, सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर आणि सावंतवाडी नगरपरिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी जलाल खान यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, ओरोस येथे जाऊन रक्तदान केले. आर.जी. स्टोन रुग्णालय, पर्वरी येथे उपचार घेणाऱ्या एका रुग्णास ‘बी पॉझिटिव्ह’ रक्ताची गरज होती. ही हाक ऐकताच सावंतवाडीचे संतोष बांदेकर यांनी गोवा बांबोळी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. या सर्व आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांशी समन्वय साधण्यासाठी आणि दात्यांना वेळेत पोहचवण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संकटकाळात रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा होऊ शकला. या सर्व रक्तदात्यांच्या कामगिरीचे आणि ‘युवा रक्तदाता संघटनेच्या’ कार्याचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page