सबनीसवाडा परिसरात अर्धवट तोडलेल्या झाडांमुळे जीवितहानीचा धोका…

तात्काळ कारवाई करा: नगरसेविका मोहिनी मडगावकर यांची मागणी..

सावंतवाडी, ता. ०४ :
शहरातील रस्त्यालगत अर्धवट तोडून ठेवलेल्या झाडांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत नगरसेविका तथा उद्यान व पर्यटन समिती सभापती सौ. मोहिनी मडगावकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राजवाड्याच्या बाजूस सबनीसवाडा येथे रस्त्यालगत अलीकडे झालेल्या वादळामुळे काही झाडे अर्धवट तोडून ठेवण्यात आली आहेत. ही झाडे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, या झाडांमुळे जर कोणतीही दुर्घटना घडली, तर त्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी अर्धवट तोडलेली झाडे तात्काळ हटवून सुरक्षितता उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

You cannot copy content of this page