⚡मालवण ता.०१-:
मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी येथील सौ. मानवी महेश वरक (वय १९) या नवविवाहितेने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, काळसे धनगरवाडी ते भंडारवाडी येथे जाणाऱ्या पायवाटेवरील झाडाला या महिलेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. तिचे लग्न होऊन एक वर्ष झाले होते. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत विनायक अशोक प्रभू (५१, रा. काळसे कल्याणवाडी यांनी पोलिसात खबर दिली. यात सौ. मानवी महेश वरक (१९, रा. काळसे धनगरवाडी) हिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. ही घटना बुधवारी दुपारी २.३० पूर्वी भंडारवाडी ते धनगरवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर असणाऱ्या धरण तळी येथे घडली. मानवी हिने जंगली वेलीला ओढणी अडकवून गळफास घेतल्याचे तिची वहिनी संगीता हिने पाहिले. त्यावेळी तिची काहीशी हालचाल होत होती. म्हणून तिला पुतणी नकुशा हिच्या मदतीने खाली उतरविले व घरातील इतरांना बोलविले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी मानवीचे सासरे शाहू वरक, सासू संगीता वरक व पुतणी नकुशा शामू वरक, सामू धोंडी वरक, देऊ वाहू वरक, दशरथ सिद्धू वरक आदी उपस्थित होते.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, आचरा पोलीस निरीक्षक पवार, मालवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तपासाबाबत सूचना केल्या. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, कट्टा पोलीस ठाण्याचे हवालदार मोरे करीत आहेत.
