कुणकेरी ग्रामस्थांचे ट्रान्सफॉर्मरसाठी उपोषण…

१०० केव्ही नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण घेतले मागे:जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांनी भेट देत दिला होता पाठिंबा..

⚡सावंतवाडी, ता.०१-:
कुणकेरी ग्रामपंचायत हद्दीतील कुणकेरी येथील ग्रामस्थांनी गावात डी.पी. ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संबंधित कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाला कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला.

गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरची नितांत गरज असल्याचे सांगत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने, निवेदने व इशारे दिले होते. मात्र, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला. सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला होता.
दरम्यान, या उपोषणाची दखल घेत महावितरण प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. पळसवाडी येथे १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी तांत्रिक मंजुरीनंतर सुरू करण्यात येणार आहे. तसेच लिंगाची वाडी येथील विद्यमान ६३ केव्ही ट्रान्सफॉर्मरऐवजी १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम पुढील ८ ते १० दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.याशिवाय गावातील १ फेज लाईनचे ३ फेज लाईनमध्ये रूपांतर करण्याचे कामही पळसवाडी, माठवाडी, पिंपळवाडी, शिरशिंगेकर व काशेवाडी या भागांमध्ये लवकरच हाती घेतले जाणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत अखेर उपोषण मागे घेतले.

You cannot copy content of this page