दशरथ कवटकर:भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन..
⚡मालवण ता.०१-:
१२९ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या आणि जिल्ह्यात एक उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज मालवणच्या शलाका वार्षिकांक हा विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना साहित्यिक चळवळीत सहभागी करून घेणारा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमातूनच साहित्य विश्वात नावलौकिक घडविणारे साहित्यिक निर्माण होतील, असा आशावाद भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबईच्या लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर यांनी येथे बोलताना केले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व ज्युनियर कॉलेजच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा. पवन बांदेकर, शिक्षिका संजना सारंग, सरोज बांदेकर, शिक्षक आर. बी. देसाई, वरिष्ठ लिपिक पी. टी. गोसावी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्री. कवटकर यांनी विद्यार्थ्यांच्या साहित्यविषयक जाणीवांचे आणि कलागुणांचे कौतुक केले. पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे यांनी आभार मानले.
