अमली पदार्थ वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर..
बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ जिल्ह्यात प्रवेश करू नयेत, तसेच त्यांची वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे मोहीम राबविण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग तसेच बांदा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त उपस्थितीत इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे येणाऱ्या-जाणाऱ्या खासगी बस, चारचाकी वाहने तसेच इतर वाहनांची श्वानपथकाच्या सहाय्याने सखोल तपासणी करण्यात आली. वाहनांमधील सामान, संशयास्पद वस्तू तसेच प्रवाशांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.
पर्यटन हंगामात अमली पदार्थांची तस्करी होऊ नये, युवकांचे भविष्य सुरक्षित राहावे आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली असून पुढील काळातही अशा तपासण्या सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
फोटो:-
इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर खासगी वाहनांची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली.
