इन्सुली शाळेला अन्नपूर्णा सेवा फाऊंडेशनकडून फॅन व चटई भेट…

⚡बांदा ता.२५-: “विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने शिक्षण क्षेत्रात योगदान देणे ही काळाची गरज आहे. आज या छोट्याशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आनंद मिळत असून, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे,” असे प्रतिपादन अन्नपूर्णा कोरगावकर यांनी इन्सुली येथे केले.
इन्सुली जिल्हा परिषद शाळा नं. ५ येथे अन्नपूर्णा सेवा फाऊंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने शाळेच्या भौतिक गरजा लक्षात घेऊन फॅन व चटई भेट देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांचा वाढदिवसही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः आकर्षक हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे तयार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शाळा परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी औषण करून व स्वागतगीत म्हणून मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी कार्यक्रमास युवा उद्योजक अखिलेश कोरगावकर, उद्योजिका ऐश्वर्या कोरगावकर, संदेश पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपेश सावंत, माजी अध्यक्ष संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत, मुख्याध्यापक भास्कर माजगावकर, शिक्षक हंसराज गवळे, अंगणवाडी सेविका दीपाली नाईक, अन्नपूर्णासेवा फाऊंडेशनच्या मृणाली वाडकर, जयदेव डोलारकर, शीतल डिसोजा, रिया मुळीक, शीतल मेस्त्री यांच्यासह पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुधीर गावडे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
फोटो:-
इन्सुली जिल्हा परिषद शाळा नं ५ येथे भौतिक सुविधा प्रदान करताना अन्नपूर्णा कोरगावकर. सोबत इतर मान्यवर. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

You cannot copy content of this page