.बांदा (दि.) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथे संपर्क फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आलेल्या दूरदर्शन संचाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी नवे दालन खुले झाले आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष यशोदा गावडे, शिक्षणप्रेमी विजय गावकर, पालक संजय गावडे, उत्तरा नाईक,नियती नाईक,अक्षरा असनोडकर , अंगणवाडी सेविका संजना गावकर मदतनीस अमृता कविटकर संचिता सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दूरदर्शन संचाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संपर्क फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त भेट असल्याचे सांगितले.
या दूरदर्शन संचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ, शैक्षणिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समज वाढीसोबतच त्यांची शिकण्याची आवड अधिक बळकट होणार आहे. शिक्षकांनाही अध्यापन करताना दृकश्राव्य साधनांचा उपयोग करून अधिक प्रभावीपणे विषय समजावून सांगता येणार आहे.
यावेळी मुख्याध्यापक जे.डी.पाटील सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख होणे अत्यंत गरजेचे आहे. संपर्क फाउंडेशनने दिलेला हा दूरदर्शन संच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना ठरणार आहे.”
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक जे.डी पाटील यांच्या बरोबर सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे व मुरलीधर उमरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपर्क फाउंडेशनच्या दूरदर्शन संचाचे घरपी शाळेत उद्घाटन…
