प्रलंबित नागरी समस्यांवर तातडीची कारवाई करा: ग्रामस्थांची मागणी..
सावंतवाडी : सर्वोदय नगर येथील त्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेत धडक दिली. येथील विविध नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करत समस्यांची गाऱ्हाणी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या समोर घातली. यावेळी मुख्याधिकारी यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
सर्वोदयनगर येथील महिला कमिटी व सर्व नागरिकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली. या परिसरातील गंभीर व दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. परिसरात पाण्याच्या पाईपलाईन तसेच गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु, संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर २ महिने झाले तरीही रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाली असून खड्डे, उंच-सखल भाग व धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्यावर्षी रस्ते दुरुस्त केलेले असताना यावर्षी ते खणून ठेवल्याचेही नागरिकांनी म्हटले. यावर मुख्याधिकारी म्हणाले, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यांचे खडीकरण करण्यात येईल, टेंडर प्रोसेस झालेली आहे. नगरसेविका निलम नाईक यांनी याबाबत नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचे लक्ष वेधले असून स्थायी समितीची बैठक या कामाच्या मंजूरीसाठी लवकर लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, येथील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात माती व कचरा साचलेला असून त्यांची नियमित साफसफाई करावी. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. भविष्यात पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असून आरोग्यविषयक संकट निर्माण होऊ शकते. याशिवाय, विजेच्या तारांचे, इंटरनेट सुविधांचे अस्ताव्यस्त जाळे अनेक ठिकाणी दिसून येते ज्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. परिसरात उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, ॲलर्जी व इतर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. विशेषतः लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्ते, अनियमित व अयोग्य स्पीड ब्रेकर यामुळे दुचाकी वाहनांवरून प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच येत्या ३० एप्रिलपर्यंत कामे पूर्ण न झाल्यास १ मे रोजी शांततामय मार्गाने लक्षवेधी उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून सेवा पुरवली जात असताना त्याचे बील कसे अदा करावे याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. यातच सर्वोदय नगर येथील एका महिलेला गॅस कंपनीच्या नावे आलेल्या फ्रॉड कॉलद्वारे लाखो रुपयांचा गंडा बसला. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावेळी मुख्याधिकारी यांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करत सुचना दिल्या. यावेळी स्थानिक नगरसेविका निलम नाईक यांनी संबंधित गॅस अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. शहरात सर्वात प्रथम सेवा सर्वोदय नगर भागात झालेली असताना अद्याप पेमेंटबाबतची माहिती ग्राहकांना का दिली गेली नाही ? तात्काळ याबाबत येथील रहिवाशांना कल्पना देऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी गुरूदत्त कामत, दिक्षा कामत, कविता नाईक, मेघना राऊळ, शरयू बार्देसकर, संभाजी नाईक, सिद्धेश नेरूरकर, योगेश कुलकर्णी, गुंडू साटेलकर आदींसह सर्वोदय नगर येथील नागरिक उपस्थित होते.
