राधानगरी मार्गे शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गातून जावा…

संदेश पारकर: सह्याद्री पायथ्याशी समांतर मार्ग विकसित करून बांद्यापर्यंत नेण्यात यावा..

कणकवली : नवीन रिवाइज शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट राधानगरी परिसराच्या जवळून जात असल्याने हा महामार्ग राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवावा, अशी मागणी संदेश पारकर यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ला जोडावा किंवा ग्रीनफिल्ड संकल्पनेनुसार सह्याद्री पायथ्याशी समांतर मार्ग विकसित करून बांद्यापर्यंत नेण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे सह्याद्री पायथ्याच्या गावांचा विकास, आर्थिक दळणवळण आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महामार्गाच्या आखणीत कणकवली, ओरोस, कुडाळ आणि सावंतवाडी या शहरांना थेट जोडणी देणे आवश्यक असल्याचे पारकर म्हणाले. प्रस्तावित संकेश्वर-रेड्डी चौपदरीकरण तसेच घोटगे-पाटगाव महामार्गाशी जोडणी झाल्यास सिंधुदुर्ग-कोल्हापूर प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे त्यांनी नमूद केले.

सध्याच्या अलाइनमेंटमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन व व्यापाराच्या दृष्टीने थेट फायदा होत नसून त्याचा अधिक लाभ गोव्याला होत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा असल्याने त्याचा प्राथमिक फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच व्हावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

राधानगरी मार्गे मार्ग दिल्यास सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, सावंतवाडी, दाजीपूर अभयारण्य, आंबोली, देवगड-मालवण-वेंगुर्ला किनारपट्टी यांसारख्या पर्यटनस्थळांना चालना मिळेल. तसेच कुणकेश्वर, आंगणेवाडी, माणगाव दत्त मंदिर, वालावल आणि धामापूर येथील धार्मिक स्थळांच्या पर्यटनालाही मोठा फायदा होईल, असे पारकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page