⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी तालुक्यातील माजगाव शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मळगाव घाटीतील कचऱ्याची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून गंभीर बनली होती. या वाढत्या अस्वच्छतेची दखल घेत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी माजगावातील तरुण युवकांना सोबत घेऊन मंगळवारी सकाळी मळगाव घाटीत विशेष स्वच्छता मोहीम राबवली. स्वयंप्रेरणेने राबवलेल्या या मोहिमेत तरुणांनी तब्बल २० गोणी कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला असून, या सामाजिक कार्याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
माजगाव गावाच्या सीमेवर असलेल्या या घाटीत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांकडून सातत्याने घरगुती कचरा फेकला जातो. परिणामी, या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून अस्वच्छता वाढत चालली आहे. वन विभागाकडून वारंवार कायदेशीर कारवाईचा इशारा देऊनही कचरा टाकण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. या कचऱ्यामुळे पर्यटक, वाहनधारक आणि विशेषतः पहाटेच्या सुमारास व्यायामासाठी या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात तर हा सर्व कचरा रस्त्यावर पसरून परिस्थिती अधिकच बिकट होत असे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र गावकर यांनी पुढाकार घेऊन माजगावातील युवकांची फळी उभी केली.
या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रसाद सावंत, ओमकार सावंत, संतोष पाटकर, मंदार सावंत, जीवन सावंत, हर्षल चौगुले, बाबुराव तेंडुलकर, देवराज राणे यांच्यासह अन्य तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या सर्वांनी मिळून संपूर्ण घाटीतील कचरा वेचून त्याचे संकलन केले. यावेळी बोलताना जितेंद्र गावकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, ज्याप्रमाणे आपण आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. रस्त्यावर किंवा गटारात कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे असून प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी. तसेच वनविभागानेही यापुढे अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. जितेंद्र गावकर आणि माजगावच्या तरुणांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जितेंद्र गावकर यांच्या नेतृत्वाखाली मळगाव घाटीत स्वच्छता मोहीम यशस्वी…
