अमरजीत आमले:बॅ. नाथ पै सेवांगण येथे सिनेमा कार्यशाळेचा समारोप..
⚡मालवण ता.१३-:
कला ही केवळ मनोरंजनासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी नसून ती समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. यासाठी कलाकाराच्या मनात समाजाप्रती प्रचंड कळकळ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व निर्माते अमरजीत आमले यांनी केले.
कलाप्रेमी बॅ. नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि ‘सिने कथा कीर्तन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिनेमा कार्यशाळेची यशस्वी सांगता रविवारी बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथील दादा शिखरे सभागृहात पार पडली. १८ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कार्यशाळेतील एकूण १२ सत्रे उत्साहात पार पडली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. सौ. ज्योती बुवा तोरसकर यांनी केले. यावेळी ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे लेखक व निर्माते तथा कार्यशाळेचे मार्गदर्शक अमरजीत आमले यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यशाळेतील सहभागी दादा वेंगुर्लेकर, हिना कांदळगावकर, गौरव सांडव, निखिल चोडणकर यांच्यासह इतरांनी मनोगते व्यक्त केली. दादा वेंगुर्लेकर यांनी या कार्यशाळेला विद्यार्थ्यांच्या भविष्यातील कारकीर्दीची दिशा देणारी सुरुवात असे संबोधले. कोकणातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी ‘कुर्ला टू वेंगुर्ला फाउंडेशन’ सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.
कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपटाचे कला दिग्दर्शक मंदार पेडणेकर यांनी आपल्या १४ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. प्रमुख पाहुणे नाट्यकर्मी राजेंद्र कदम यांनी कथामाला कार्यशाळेतील अनुभव सांगत सिनेमा, कथा आणि कीर्तन यांचा संगम प्रभावी असल्याचे नमूद केले.
मान्यवर अतिथी प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी सध्याच्या तरुणांमध्ये दिशेचा अभाव जाणवतो, अशा कार्यशाळा त्यांना मार्गदर्शन करून आत्मविश्वास वाढवतात, असे सांगितले. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांची विशेष गरज असल्याचेही नमूद केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी बॅ. नाथ पै यांच्या कलाप्रेमाची आठवण करून देत त्यांनी स्थानिक दशावतारी कलेला दिलेले प्रोत्साहन अधोरेखित केले.
या कार्यक्रमास कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, शिबिरार्थी व सेवांगण कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋतुजा केळकर यांनी केले, तर आभार कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मानले.
