भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार झाले बिनविरोध:काही ठिकाणी लढत निश्चित.!
कणकवली : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट झाले असून दहा ग्रामपंचायतींतील ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्या जागांवर बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी मात्र एकापेक्षा अधिक अर्ज आल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे.
प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झालेल्यांमध्ये कासार्डे प्रभाग क्रमांक २ मधून शितल शेट्ये, कळसुली प्रभाग क्रमांक ३ मधून प्रांजल घाडीगांवकर, पिसेकामते प्रभाग क्रमांक ३ मधून देवेंद्र सावंत, हुंबरठ प्रभाग क्रमांक १ मधून मनिषा जाधव, हळवल प्रभाग क्रमांक ३ मधून गौरी परब, तळेरे प्रभाग क्रमांक १ मधून निलम वाडये व प्रभाग क्रमांक २ मधून प्राची चव्हाण, डामरे प्रभाग क्रमांक १ मधून भाग्यश्री सावंत, कलमठ प्रभाग क्रमांक ३ मधून मृण्मयी जाधव, आयनल प्रभाग क्रमांक १ मधून अशोक मगम तसेच वारगाव प्रभाग क्रमांक १ मधून महेंद्र केसरकर यांचा समावेश आहे.
तर दारिस्ते येथील सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी प्रिती कदम, सिद्धी गुरव व पूजा गुरख असे तीन अर्ज दाखल झाले आहेत. तळेरे येथील सर्वसाधारण जागेसाठी सागर डंबे, उद्धव महाडिक व आदित्य महाडिक असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. साकेडी येथील सर्वसाधारण महिला जागेसाठी ऋतुजा सदडेकर व साक्षी घाडी असे दोन अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच घोणसरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी राजेंद्र राणे, अनंत गुरव व प्रसाद राणे असे तीन अर्ज दाखल झाले आहेत.
या अर्जांची छाननी १५ एप्रिल रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १७ एप्रिल आहे. आवश्यकतेनुसार २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
