वेंगुर्ला मठ सावंतवाडी मार्गावर दुतर्फा धोकादायक झाडे…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला – मठमार्गे सावंतवाडी हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. या मार्गाच्या दुतर्फा जीर्ण झालेली व झुकलेली झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत. दीड महिन्यांनी पावसाळा हंगाम सुरु होणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षमुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत या भागाचे आमदार दिपक केसरकर यांनी वेळीच लक्ष पुरवून कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी तसेच मठमार्गे कुडाळ हा तिन्ही तालुक्याना जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. मुख्यत : वेंगुर्ला मठ सावंतवाडी या रस्तादुतर्फा आकेशिया, आंबा, वटवृक्ष व अन्य प्रकारची झाडे असून यातील अनेक झाडे लोम्बकळत आहेत. वादळी पावसात ही झाडे रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प होण्याबरोबरच एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सा. बां. विभाग ही धोकादायक झाडे कटिंग करून रस्ता सुरक्षित कधी करणार? असा सवाल वाहनचालक व प्रवाशांमधून विचारला जात आहे.मागील काही वर्षात झालेल्या वादळात मुख्य मार्गांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर मठ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. गेल्या काही वर्षात या मार्गावर अशीच धोकादायक झाडे उन्मळून पडल्याने कित्येक वेळा वाहतूक ठप्प झाली होती. विद्युत पुरवठाही खंडित होता. शिवाय यामुळे कित्येक अपघातही झाले आहेत. आजही झुकलेले अनेक वृक्ष या मार्गादुतरफा धोकादायक स्थितीत उभे आहेत. या मार्गावरील भटवाडी, आडेली, मठ ठाकूरवाडी, आडेली
खुटवळवाडी, जांभरमळा, कामळेवीर या ठिकाणी असे धोकादायक वृक्ष प्राधान्याने आहेत. अनेक ठिकाणच्या मार्गालगत समांतर वीजवाहिन्या व
पथदीप आहेत. पावसाळा दीड महिन्यावर आला आहे. वादळी पावसात ही झाडे रस्त्यावर कोसळण्याचा धोका आहे. यामुळे साहजिकच लगतच्या वीज वाहिन्या
तुटण्याबरोबरच मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. शिवाय अशी झाडे, फांद्या चालत्या वाहनावर पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील कालावधीत आडेली पोस्ट स्टॉप नजिक झाडाला अडकून काजू वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात झाला होता. आडेली खुटवळवाडी येथे पहाटे च्या सुमारास पडलेल्या आकेशियाच्या झाडावरून जाऊन वेंगुर्ला गाडीअड्डा येथील वाहनास अपघात झाला होता. जांभरमळा येथे वादळी वाऱ्यात किराणा दुकानावर झाड पडून स्थानिकाचे दुकान जमीनदोस्त झाले होते. अनेकवेळा या मुख्य मार्गांवर वादळी वाऱ्यामुळे झाडे पडल्यास वाहतूक आडेली श्री देव सोमेश्वर मंदिर मार्गे व मठ मोडकेपूल या अरुंद मार्गांवरून रेटली जाते. त्यामुळे स्थानिकांना दरवर्षी याचा फटका सहन करावा लागतो.मुख्य मार्गांवरील धोकादायक झाडे कटिंग न करता झाडे पडल्यानंतर संबंधित विभाग ठेकेदारामार्फत ही कामे करून घेते, ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरूच आहे. शासनास मात्र याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.या मार्गांनजिक बऱ्याच ठिकाणी स्ट्रीटलाईट्स, विद्युतवाहिन्या यावर झाडी वाढली आहे. याबाबत विद्युत विभागाचीही जबाबदारी आहे. मात्र दोन्ही विभाग पावसाळा सुरु झाल्यानंतर झाडी कटिंग करण्याची पूर्तता करते. यात विद्युत पुरवठा बंद राहिल्याने नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना त्रास हा कायमच सहन करावा लागतो. दोन्ही विभागानी समन्वय साधून पावसाळी हंगामापूर्वी धोकादायक झाडी कटिंग केल्यास नागरिकांना, वाहनधारकांना चांगली सुविधा मिळू शकते. आता तर प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी निवडून येत जनतेच्या सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे शासनाने या समस्येची गांभीयनि दखल घेत, पावसाळ्यापूर्वी या मार्गादुतर्फा असलेले धोकादायक वृक्ष हटवून मार्ग सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.

You cannot copy content of this page