महाराष्ट्रातील दमदार नेतृत्व म्हणजे नारायण राणे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:खा. नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य सोहळा; दिग्गज नेत्यांकडून कार्याचा गौरव..

⚡कणकवली ता.११-:
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळा उत्साहात व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात राज्य व केंद्रातील दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून खा. नारायण राणे यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा गौरव केला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील दमदार नेतृत्व म्हणजे नारायण राणे. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. सभागृहात केलेल्या माझ्या पहिल्या भाषणानंतर त्यांनी पाठवलेली चिट्ठी आजही लक्षात आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. अर्थसंकल्पावर त्यांनी केलेली भाषणं सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारी ठरत असत. कोणत्याही विषयाचा अभ्यास करून ते सडेतोड भूमिका मांडत.

ते पुढे म्हणाले की, राणे साहेबांनी गोरगरिबांसाठी काम केलं. अनेकांना घरे मिळवून दिली. गुणवत्तेवर कधीही तडजोड केली नाही. कोकणच्या विकासासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं. मराठी माणसाचा अभिमान त्यांनी कायम जपला. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या शताब्दी वर्षाचा सोहळा आपण याच मैदानावर साजरा करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री नितेश राणे, नामदार उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, आमदार दीपक केसरकर, आमदार प्रसाद लाड, आमदार निलेश राणे, सौ. निलमताई राणे, भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, खा. नारायण राणे यांचं जीवन मला अतिशय जवळून पहाण्याची संधी मिळाली. त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले. वडील गिरणी कामगार होते आणि आईचा डोक्यावर हात होता. लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्यातून त्यांना जी संधी मिळाली त्याचं त्यांनी सोन केलं. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली कामगिरी सर्वांसमोर आहे. अठरा ते वीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. माझे पारिवारिक जेष्ठ मित्र म्हणून नारायण राणे यांचं नाव आहे. माझ्या कामांत ज्या ज्या वेळी अडचणी यायच्या तेव्हा ती काम झाली पाहिजे यासाठी ते माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले.

ते पुढे म्हणाले की, भूतकाळातील इतिहास लक्षात ठेवायचा आणि वर्तमानकाळात भविष्याचा इतिहास घडवायचा असतो. सुस्पष्ट विचार, परखड नेतृत्व, हो ते हो नाही ते नाही, पटलं ते मांडलं अशी त्यांची कार्यशैली आहे. राणे साहेबांनी कोणताही निर्णय घेताना लोकांचं हित लक्षात घेतलं. प्रशासकीय कौशल्य मंत्री म्हणून लक्षात आलं. महसूल विभागाची जबाबदारी असताना ते सगळ्यात प्रभावी कामगिरी करणारे मंत्री म्हणून ओळखले गेले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांना नेहमीच धारेवर धरलं. कधीही तडजोड केली नाही. त्यांचं वक्तृत्व प्रभावी होतं. कोकणचा विकास, रोजगार, औद्योगिकीकरण यासाठी ते सातत्याने झटत राहिले. महाराष्ट्रासह देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांनी आम्हाला लहान भावासारखं प्रेम दिलं. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना साथ दिली. त्यांचा संसार असाच सुखी राहो. राणे साहेब शब्दाचे पक्के आहेत. यावर्षी मे महिन्याआधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल तसेच कोल्हापूर रत्नागिरी मार्ग पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

सुनील तटकरे म्हणाले, चेंबूर मध्ये काम करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करताना राजकीय वाटचाल सुरू केली. मुंबई महापालिकेच्या समितीचा अध्यक्ष सलग तीन वर्षे कोण राहील असेल तर राणे साहेब. १९९० साली राणे साहेब कणकवली निर्वाचीत झाले. राणे साहेब आणि माझ्यात वृनानुबंध तयार झाले. रुबाबदार व्यक्तिमत्व कसं असावं तर राणे साहेबांकडे पाहून करायला मिळालं. राणे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना आठ नऊ महिन्याचा कालावधी मिळाला. जर या नेत्याला अलीकडच्या काही दिवस मिळाले असते तर कोकणचा कायापालट झाला असता. मी जेव्हा विरोधी पक्ष नेता असताना मला वेगळा अनुभव मिळाला. नारायण राणे यांची उत्तम भाषण व्हायची. अभ्यासू विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केलं तेही अनुभवता आले. शिवसेना प्रमुख हयात असताना काय पद दिली जातात ते सांगणारा आणि अनुभवणारा नेता कोण असेल तर ते नारायण राणे. रंगशारदा मध्ये केलेलं भाषण अजूनही आठवत. राणे साहेब आक्रमक स्वभावाचे नेते. उत्तम पद्धतीने ते कामगिरी बजावायचे. काँग्रेसने कधीही राणे साहेबांना मुख्यमंत्री केलं नसत. आज मला काही टीका करायची नाही. नारायण राणे विरोधी पक्षनेता म्हणून काम करतात ते पहा आणि तस काम करण्याचा प्रयत्न करा असे आम्हाला पवार साहेबांनी सांगितले होते. मला तीन विधानपरिषद मध्ये जे मतदान झालं त्याच श्रेय राणे साहेबांना जात. शासकीय रुग्णालयाखेरीज मेडिकल कॉलेज उभं केलं आहे. मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व जास्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे पॅटर्न फक्त राणेच दाखवू शकतात ते जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत दिसून आले आहे. भाषणादरम्यान त्यांनी जीवनात ही घडी अशीच राहूदे अशा शब्दात शुभेच्छा व्यक्त केली.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, दादांबद्दल वाढदिवसानिमित्त काय बोलावे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने धडे घेतले पाहिजेत. मला कोणी विचारलं तर मी दादांच्या नेतृत्वाखाली भाजप कोकणात वाढत चालले आहे असे सांगतो. कोकणातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम दादांनी केलं. दादांनी भाजपात प्रवेश केल्यावर भाजपाची वाढ झाली. २००९ ला मी जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत गेलो तेव्हा दादांची भेट झाली. तेव्हा दादा म्हणाले तू ज्या क्षेत्रातून आला आहेस तिथून अशी संधी मिळणं कठीण आहे. तुला प्रामाणिकपणे काम करता येईल तेवढं कर. दादांचा हाताला मार लागलेला असून त्या परिस्थितीतही दादा सभागृहात आले. पक्षातील सर्व आमदार दादांसोबत होते. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. गणराया चरणी एवढीच प्रार्थना दादांना चांगले आशीर्वाद व निरोगी आयुष्य लाभो.

उदय सामंत म्हणाले की, २००४ ला विधानसभेचा आमदार झालो तेव्हा शपथ कशी घ्यायची हे माहिती नव्हत. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून राणे साहेब होते. यावेळी माझं नाव उदय सावंत अस नाव घेतलं. त्यावेळी नारायण राणे साहेबांनी थांबवल आणि म्हणाले उदय सामंत हे कोकणातले आमदार आहेत. त्यामुळे सभागृह थांबवा आणि पुन्हा नाव दुरुस्ती करून घ्या. संघर्ष झाल्यावर कोणी काय बदल केले पाहिजे ते सांगणारे राणे साहेबच होते. आमच्यात सुधारणा करण्याचा अधिकार आई वडिलांप्रमाणे राणे साहेबांना देखील आहे. राजकारणाचा संस्कार जपण्याच काम राणे साहेबांनी केलं आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात नमूद केल्याप्रमाणे राणे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा गौरव करत त्यांना आवडणारे पुस्तक भेट देण्यात येणार असल्याचे सांगितले. आयुष्यभर झगडत शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि कोकणचा बुलंद आवाज असलेले राणे साहेब शब्दाला जागणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कोकणातील जनतेच्या मनात “दादा” म्हणून असलेले स्थान आणि मराठी भाषेचा सन्मान राखणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार नारायण राणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा अमृतमहोत्सवी सोहळा माझ्या दोन्ही चिरंजीवांनी आणि कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. उपस्थित मान्यवरांनी केलेल्या भाषणाला उत्तर देणे कठीण आहे. आयुष्यात अनेक मंत्री आणि नेत्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. अनेक वेळा राज्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटण्याचा योग आला. आयुष्यात निर्धार, निश्चय आणि मेहनत असेल तर काहीही अशक्य नाही. मला इथपर्यंत आणणारी शिडी म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन. त्यांच्या सभांना मी आणि माझा मित्र हार घेऊन जायचो आणि त्यातूनच माझा राजकीय प्रवास सुरू झाला. मी आयुष्यात कधी पद मागितले नाही, ते मला दिले गेले. महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक म्हणून काम करत राहणार आहे. मी ७४ वर्ष पूर्ण केली असून स्वतःला भाग्यवान समजतो. आयुष्यात माणुसकी मिळवली आणि आज मान्यवरांकडून मिळालेलं कौतुक ही माझी मोठी संपत्ती आहे. माझ्या मुलांनीही या मार्गावर चालावे अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमातून मला प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page