⚡मालवण ता.०९-:
मालवण तहसील कार्यालयाच्या अखत्यारितील मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे वीज वितरणने खंडित केला आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस दोन्ही कार्यालये विजेविना सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
मालवण येथील मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयातून नागरिकांना कागदपत्रे घेण्यासाठी जावे लागते. मात्र, गेले काही दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना कागदपत्रे मिळेनाशी झाली. या कार्यालयातील वीजबिल एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत असल्याचे बोलले जात आहे. महसूल प्रशासनाकडे वारंवार वीजबिल भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, मार्च अखेर होऊनही वीज बिलासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने अखेर वीज कंपनीकडून मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
मालवण तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडित केल्याच्याही घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयांना ग्रामपंचायतींकडून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, येथील कार्यालयातील वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयात अनेक नागरिक येतात. मंडळ अधिकारी कार्यालयात दाव्यांची सुनावणी सातत्याने होत असते. आता तर नागरिक आणि अधिकारी, कर्मचारी उकाड्याने हैराण होत आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, सातत्याने नागरिकांच्या मागणीनंतर पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर आणून ऑनलाईन सातबारा उतारा काढून देण्याची व्यवस्था केली होती. मात्र, जनरेटवर काही तासच काम चालणार आहे. दिवसभर जनरेटर सुरू राहिल्यास त्याचा पेट्रोलचा खर्च कोण करणार, असाही प्रश्न केला जात आहे. वीज कंपनीकडून शासकीय कार्यालयांना सूट देण्यात येत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
