मतदान नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी, कणकवली यांचे नागरिकांना आवाहन…

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत सूचना..

⚡कणकवली ता.०७-: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कणकवलीचे मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.

या कार्यक्रमांतर्गत सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीतील नावांचे सन 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्यात येणार आहे. तसेच मतदारांच्या नोंदीतील त्रुटी (नाव, पत्ता, जन्मतारीख इ.) दुरुस्त करणे, स्थलांतरित, अनुपस्थित व मृत व्यक्तींची नावे वगळणे आणि पात्र नव्या नागरिकांची नावे समाविष्ट करणे या बाबींवर कार्यवाही केली जाणार आहे.

नागरिकांनी voter.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन “Search Your Name in Last SIR” या पर्यायाद्वारे आपले नाव तपासावे. नाव आढळल्यास संबंधित विधानसभा मतदारसंघ क्रमांक, भाग क्रमांक व अनुक्रमांक ही माहिती नोंदवून आपल्या क्षेत्रातील BLO (मतदार केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्याकडे सादर करावी.

जर एखाद्या नागरिकाचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत आढळत नसेल, तर त्यांनी आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव, त्या काळातील राहण्याचे ठिकाण (गाव, तालुका, जिल्हा) तसेच उपलब्ध असल्यास संबंधित मतदार यादीतील तपशील तयार ठेवून BLO यांना द्यावा. विवाहानंतर स्थलांतरित झालेल्या महिलांनी माहेरच्या गावातील 2002 च्या मतदार यादीतील माहिती सादर करणे आवश्यक आहे.

या मोहिमेदरम्यान BLO अधिकारी घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करणार असून नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करावे. अचूक व सत्य माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल व केवळ निवडणूक प्रक्रियेसाठी वापरली जाईल.

मतदार यादी शुद्ध व अचूक ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page