बोगस खते आणि कीटकनाशकांना आळा घाला…

कणकवली पंचायत समितीच्या बैठकीत सदस्य झाले शेतकऱ्यांसाठी आक्रमक:नूतन सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली प. पू. भालचंद्र सभागृहात पार पडली बैठक..

⚡कणकवली ता.०६-: तालुक्यातील शेतकरी तसेच आंबा व काजू बागायतदारांना बोगस खते व कीटकनाशकांमुळे मोठा फटका बसत असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानासोबतच या फसवणुकीमुळे काही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ ओढवल्याचा गंभीर मुद्दा पंचायत समितीच्या बैठकीत उपस्थित झाला. पंचायत समिती सदस्य राजेश जाधव यांनी तालुका कृषी अधिकारी श्री. ओहोळ यांना यावरून खडेबोल सुनावत तातडीने कारवाईची मागणी केली.

बोगस खते व कीटकनाशके विकणाऱ्यांवर कृषी विभागाचा नियंत्रण नसल्यानेच त्यांचे फावले आहे, असा आरोप जाधव यांनी करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही भूमिका मांडली. यावर उत्तर देताना कृषी अधिकाऱ्यांनी निरीक्षकांची अपुरी संख्या व तपासणी प्रयोगशाळांची कमतरता यामुळे कारवाईत अडचणी येत असल्याची कबुली दिली.

दरम्यान, चार वर्षांनंतर पंचायत समितीची मासिक सभा सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली प. पू. भालचंद्र सभागृहात पार पडली. या बैठकीत शिक्षण, आरोग्य, कृषी, वन, पशुसंवर्धन, एमआरजीएस, पंतप्रधान आवास योजना, महावितरण, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याने त्यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. सावंतवाडी येथून पकडलेली माकडे फोंडाघाट परिसरात सोडल्याने स्थानिकांना त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले. तसेच तळेरे, पियाळी आदी भागातील आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची रिक्त पदे असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

जि. प. बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करण्यात आली. बीएसएनएल टॉवर असूनही मोबाईल रेंज मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच महावितरणने पावसाळ्यापूर्वी जीर्ण वीज वाहिन्या व खांब बदलण्याचे काम हाती घ्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर जात नसल्याने योजनांची माहिती मिळत नसल्याची तक्रारही सदस्यांनी केली. केवायसी व योजना लाभासाठी शेतकऱ्यांना शहरात जावे लागत असल्याने ग्रामस्तरावर शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी करण्यात आली. ग्रामसभांना अधिकारी उपस्थित राहत नसल्याबाबतही नाराजी व्यक्त झाली.

पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर

जिल्ह्यासाठी मिळालेला निधी पूर्णपणे खर्च केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात येऊन तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

बैठकीस उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विविध विभागांचे अधिकारी व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page