आयुष्मान भारत योजने अंतर्गत आता ‘या’ खाजगी रुग्णालयांतही मिळणार मोफत उपचार…

५ लाखांपर्यंतचे कवच; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा..

⚡सिंधुदुर्ग दि.०२-: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आता सर्वसामान्यांना खाजगी रुग्णालयांमध्येही महागडे उपचार मोफत मिळणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित खाजगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, प्रशासनाकडून अद्ययावत यादी जाहीर करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यामध्ये औषधे, शस्त्रक्रिया, निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या तसेच रुग्णालयातील वास्तव्याचा खर्च समाविष्ट असतो. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी सहभाग घेतल्यामुळे आता नागरिकांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा मुंबईसारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही.

योजनेमुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, गंभीर आजारांवरील उपचारही आता खाजगी रुग्णालयांत एकाही रुपयाचा खर्च न करता घेता येणार आहेत.

जिल्ह्यातील समाविष्ट प्रमुख खाजगी रुग्णालये :

कुडाळ : सुधा हॉस्पिटल, कोकण कॅन्सर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

कणकवली : संजीवन हॉस्पिटल, गुरुकृपा हॉस्पिटल, एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाइफटाईम हॉस्पिटल, डॉ. नागवेकर हॉस्पिटल अँड नर्सिंग होम, विवेकानंद नेत्रालय, श्रीराम हॉस्पिटल आणि मॅटरनिटी होम

सावंतवाडी/नेरूर : डॉ. गोडे आय केअर सेंटर, चितारी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, यश हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, ब्र. नाथ पै शिक्षण संस्था संचलित पर्यवंतर नाईक रूरल हॉस्पिटल (नेरूर)

मालवण/देवगड : अंकुर हॉस्पिटल, झांटे क्लिनिक (मालवण)

नागरिकांनी काय करावे?

१) उपचारासाठी जाताना ‘आयुष्मान कार्ड’ सोबत ठेवावे.

२) संबंधित रुग्णालयातील ‘आयुष्मान मित्र’ यांच्याशी संपर्क साधून उपचार प्रक्रिया समजून घ्यावी.

३) कार्ड नसल्यास जवळच्या सेवा केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन पात्रता तपासून घ्यावी.

You cannot copy content of this page