⚡देवगड ता.०२-:
मिठबाव कातवण तांबळडेग या तीन गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सव आज २ एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. मिठबाव, कातवण आणि तांबळडेग परिसरातील ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईश सेवेचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५ वाजता हनुमान जन्माच्या कीर्तनाने झाली. ह.भ.प. कमलाकर पाटकर बुवा (कोटकामते) यांनी आपल्या ओजस्वी आणि सुश्राव्य कीर्तनातून हनुमान जन्माची कथा रसाळ शैलीत सादर केली. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर ६ वाजून २८ मिनिटांनी हनुमान जन्म सोहळा , आरती पार पडून धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेले.
सकाळी सुमारे ६.४५ वाजता पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. मंदिर परिसरात काढण्यात आलेल्या या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला. “जय हनुमान”च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मिठबाव येथील हनुमान मंदिरात सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन केले असून भाविकांची श्रीच्या दर्शनासाठी गर्दी दिसत आहे. सायंकाळी श्रींची महाआरती व पालखी प्रदक्षिणा सोहळा संध्याकाळी संपन्न होणार आहे.
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम परंपरेप्रमाणे हा उत्सव मोठ्या दिमाखात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
