संजू परब यांचा उबाठा सेनेला टोला:केसरकरांवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचं तोंड आरशात पाहावे..
सावंतवाडी ता.३०-:कोणाचे तरी पैसे घेऊन मोर्चा काढणाऱ्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करू नये, टीका करण्याआधी त्यांनी आपलं तोंड आरशात पाहावं, असा जोरदार टोला शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी लगावला. तसेच सिंधुदुर्गातील शिंदे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना परब म्हणाले की, उबाठा सेनेचे काही पदाधिकारी पैसे घेऊन मोर्चे काढत आहेत. ज्यांनी पूर्वी केसरकर यांच्यासोबत काम करून स्वतःचा फायदा करून घेतला, तीच मंडळी आता त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे जनतेने या लोकांची पात्रता ओळखलेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
केसरकर हे आमदार असून ते मंत्रीही राहिलेले आहेत. त्यामुळे विविध लोक त्यांना भेटायला येणे साहजिक आहे. एखाद्या व्यक्तीसोबत फोटो आला किंवा मंदिरात गेले म्हणून कुणालाही गुन्हेगार ठरवणे योग्य नाही. केसरकर यांची बदनामी करण्याचा प्रकार थांबवावा, असेही परब यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, पकडून आणलेली माणसं उबाठाच्या आंदोलनात असून मतदारसंघातील महिला दीपक केसरकर यांच्या पाठीशी आहेत. भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे असे ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, क्लेटस फर्नांडिस, गुंडू जाधव, राकेश पवार, संजय गावडे आदी उपस्थित होते.
