बंद बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; लाखो रुपयांचा ऐवज लंपास…

⚡वैभववाडी ता.२९-: नाधवडे येथील परशुराम इस्वलकर यांचा बंद असलेला बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून फ्रिज, इन्व्हर्टर, गॅस सिलेंडर तसेच इतर घरगुती साहित्याची मोठ्या प्रमाणात चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी इस्वलकर यांच्या निदर्शनास आली असून याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नाधवडे शिडवणे रोडलगत परशुराम इस्वलकर यांनी नवीन बंगला बांधला आहे. मात्र सध्या ते या बंगल्यात राहत नसून नाधवडे चारवाडी येथे वास्तव्यास आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांनी बंगल्याची पाहणी केली असता सर्वकाही व्यवस्थित होते. मात्र शनिवारी दुपारी पुन्हा बंगल्याकडे गेले असता मुख्य दरवाजा तोडलेला दिसून आला. घरात प्रवेश केल्यानंतर फ्रीज, गॅस सिलेंडर, किमती भांडी, बाथरूम मधील नळ, विविध प्रकारच्या लाईट्स अशा वस्तूंची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय बंगल्याची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया बांगाडे, फक्रुद्दीन आगा आणि संदीप कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच श्वानपथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान दोन दिवसां पूर्वीच अज्ञात चोरट्यांनी वैभववाडी बाजारपेठेत दोन घरे फोडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच एक मोटार सायकल चोरीची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा नाधवडे येथे घरफोडी झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
CCTV बंद;चोरट्यांना मोकळे रान
वैभववाडी नगरपंचायती तसेच पोलिसांच्यावतीने बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही काळापासून बंद असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चोरट्यांचा माग काढणे कठीण जात असून नागरिकांमधून तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची जोरदार मागणी होत आहे

You cannot copy content of this page