११.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त: एक जण ताब्यात..
⚡बांदा ता.२९-: : बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून, चेकपोस्टवर वाहनासह मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बांदा चेकपोस्ट येथे तपासणीदरम्यान संशयित वाहन अडविण्यात आले. यावेळी आरोपी प्रशांत रवींद्र जाधव (वय ३३, रा. बौद्धवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला.
या कारवाईत विविध ब्रँडच्या एकूण १,४५२ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ४,०८,००० रुपये इतकी आहे. यामध्ये McDowell’s No.1, Royal Challenge, Royal Stag, Royal Green व Reserve 7 या ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे. तसेच आरोपीकडील टोयोटा इनोव्हा (MH 43 N 2339) ही अंदाजे ७ लाख रुपये किंमतीची गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ११,०८,००० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद पंडित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) अन्वये गुन्हा रजि. नं. २९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोहेकाॅ/८७८ परब यांनी नोंदवली असून, पुढील तपास पी.एन./१२१३ नाईक हे करीत आहेत.पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे दारू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
