तळाशीलच्या मच्छिमारांवरील अन्यायाची प्रशासनाने दखल न घेतल्यास आमरण उपोषण छेडू…

रेवंडी – तळाशील वादात मच्छिमार नेत्यांचा इशारा..

⚡मालवण ता.२८-: रेवंडी येथील जेटीवर तळाशीलच्या मच्छिमार ग्रामस्थांना मासेवाहतुकीस व वाहने लावण्यास तेथील ग्रामस्थांकडून विरोध असल्याने मच्छिमार बांधवांवर होणाऱ्या या अन्यायाबाबत आज मच्छिमार नेत्यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांची भेट घेऊन लक्ष वेधले. तोंडवळी तळशील येथील मच्छिमार बांधवांवर होणाऱ्या अन्याया बाबत जर प्रशासनाने दखल घेतली नाही, तर त्या ठिकाणी आम्ही सर्व मच्छिमार बांधव तोंडवळी तळशील मच्छीमारांच्या सोबत ठाम राहून आमरण उपोषण छेडून कायदेशीर न्याय मागू, असा इशारा यावेळी मच्छिमार नेत्यांनी दिला.

कालावल खाडीमध्ये रेवंडी समोरील भागात अनधिकृत वाळू उपश्याला तळाशिल ग्रामस्थांनी विरोध करत त्यावर कारवाई होण्यासाठी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन दिले होते. या वाळू उपशाला विरोध केल्याच्या कारणावरून रेवंडी येथील ग्रामस्थांनी रेवंडी जेटीवर तळाशीलच्या मच्छिमारांना मासे वाहतुकीस तसेच वाहने लावण्यास विरोध केला आहे, असा आरोप तळाशील ग्रामस्थांनी करत त्यामुळे मासे विक्रीस अडथळा होत असून मासे वाहतूक व वाहनांच्या सुरक्षिततेचे बाबत योग्य ती कार्यवाही करून तळाशिल ग्रामस्थांना सहकार्य करावे अशा मागणीचे निवेदन मालवण तहसीलदार यांना दिले होते. मात्र याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने आज मालवण येथील मच्छिमार नेत्यानी तोंडवळी – तळाशील ग्रामस्थांसोबत मालवण तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी दिलीप घारे ,छोटू सावजी, बाबी जोगी, संजय केळूसकर, भाऊ सादये, नागेश कोचरेकर, आनंद खडपकर ,वसंत गावकर, भाऊ मायबा ,नंदकुमार कोचरेकर, विद्याधर पराडकर, पुंडलिक जुवाटकर, केशर जुवाटकर ,हनुमंत देऊळकर, गणेश रेवणकर आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना मच्छिमार नेते दिलीप घारे म्हणाले, रेवंडी येथील ग्रामस्थ असोत किंवा व्यावसायिक असोत त्यांनी तळाशील मधील मच्छिमारांवर केलेल्या अन्यायाबाबत मच्छिमार नेत्याना तोंडवळी- तळशील ग्रामस्थानी कल्पना दिली. त्यामुळे आज आम्ही मालवण तहसीलदारांना वस्तुस्थिती बाबत माहिती दिलेली आहे. तहसीलदार यांनी रेवंडी गावाचे सरपंच किंवा त्या गावाची ग्रामपंचायत यांना याची कल्पना देऊन या अन्याया बाबत तोडगा काढण्याची जबाबदारी घेतली आहे. जर प्रशासनाने दखल घेतली नाही, तर आम्ही सर्व तोंडवळी तळाशील मच्छीमारांना सोबत घेऊन रेवंडी जेटीच्या ठिकाणी आमरण उपोषण छेडून कायदेशीर न्याय मागण्याचा प्रयत्न करू, असेही श्री.घारे म्हणाले.

You cannot copy content of this page