कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून २५ हजार, तर स्वामी भक्ताकडूनही २५ हजारांचा हातभार..
⚡सावंतवाडी ता.२८-:
सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका उपक्रमासाठी विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी यांच्या वतीने २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच एका स्वामी भक्तानेही २५ हजार रुपये देऊन या उपक्रमाला हातभार लावला.
सोसायटीच्या चेअरमन श्रीमती आनमारी डिसोजा, उपाध्यक्ष पिटर दिमा, सेक्रेटरी मार्टिन आल्मेडा व जनरल मॅनेजर जेम्स बोर्जिस यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.या सेवाभावी कार्यासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर व रवी जाधव यांनी सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था असून “सामाजिक कार्याचा निर्धार, जनसामान्यांचा आधार” हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्यानुसार संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते.दरम्यान, रुग्णांच्या सेवेसाठी प्रस्तावित रुग्णवाहिकेसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, अवघ्या दहा दिवसांत ही रुग्णवाहिका सेवेसाठी सज्ज होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश व उपाध्यक्ष शैलेश नाईक यांनी दिली.
