चैत्र नवरात्र उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता..
⚡देवगड ता.२६-:
मिठबाव, कातवण आणि तांबळडेग या गावांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिरात यंदाचा चैत्र नवरात्र उत्सव अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या उत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी पुराण वाचन, गायन, कीर्तन आणि रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढण्यात येत होती. या सर्व धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.
हिंदू धर्मात चैत्र नवरात्र उत्सवाला विशेष महत्त्व असून या काळात देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. उपवास, जप, कीर्तन आणि पुराण वाचनाद्वारे भाविक अध्यात्मिक साधनेत सहभागी होतात. या नवरात्रोत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाने होत असल्याने या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दि. 26 मार्च 2026 रोजी रामनवमी निमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी रघुपती पूजन व श्रीराम रक्षा स्तोत्राचे सामुदायिक पठण पार पडले. त्यानंतर ह.भ.प. कमलाकर पाटकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. दुपारी शुभमुहूर्तावर श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महाआरती, पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न झाला.
सायंकाळी पुराण वाचन, हरिपाठ, सुश्राव्य गायन, सांज महाआरती, कीर्तन व भजन अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. या उत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या भजनाने तसेच सुधांशू सोमण यांनी केलेल्या गायनाने आणि रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पालखी प्रदक्षिणेने उत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली.
