आम. निलेश राणे:कुडाळ मध्ये नमो उद्यानाचे भूमिपूजन :आमदार निलेश राणे यांच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कानपिचक्या..
⚡कुडाळ ता.२६-: कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे ५ कोटी रुपयांचे पारितोषिक आपल्याला मिळालेच पाहिजे, त्यापेक्षा कमी मला काहीही मान्य नाही, अशा स्पष्ट आणि आक्रमक शब्दांत आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे कान टोचले. कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘नमो उद्यान’ योजनेचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार राणे पुढे म्हणाले की, या उद्यानासाठी शासनाने १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, राजस्तरावरील स्पर्धेत पहिल्या क्रमांकासाठी ५ कोटींचे बक्षीस आहे. नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांनी कसंही करून हे बक्षीस मिळवून दाखवावे. मच्छिंद्र कांबळी सभागृहासाठी १५ कोटी, नगरपंचायत इमारतीसाठी ५ कोटी आणि नळपाणी योजना, घनकचरा व्यवस्थापन, एमआयडीसी रस्ते यासाठी कोट्यवधींचा निधी आपण आणला आहे. आता कामाचा दर्जा राखण्याची जबाबदारी तुमची आहे.
कुडाळमध्ये हे उद्यान व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. आज ते उपस्थित राहू शकले नसले तरी, त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे काम मार्गी लागल्याचे सांगत निलेश राणे यांनी त्यांचे आभार मानले. हे उद्यान शहराचे कल्चर दर्शवणारे असावे. ज्येष्ठ नागरिकांचे इनपुट घ्या आणि असे उद्यान बनवा की लोकांनी तुमचे कौतुक केले पाहिजे असेहीआमदार निलेश राणे म्हणाले.
कार्यक्रमाच्या नियोजनातील त्रुटींवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. व्यासपीठावर खुर्च्यांसाठी होणारी धडपड थांबवा. लोकांच्या कामासाठी धडपड करा. येणाऱ्या काळात कुडाळ नगरपंचायत निवडणूक आहे, त्यामुळे आपसातील मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी वेळ द्या. जनतेने विश्वासाने तुम्हाला खुर्चीवर बसवले आहे, ती खुर्ची म्हणजे मंदिर आहे, याचे भान ठेवा. मी आमदार म्हणून गेल्या सव्वा वर्षात विरोधकांना बोट दाखवायला जागा ठेवली नाही, तसेच काम तुमच्याकडूनही अपेक्षित आहे, असे राणे यांनी ठणकावून सांगितले.
नगर पंचायत अभियंता श्रीमती हळदणकर यांनी नमो उद्यानासाठीच्या सर्व परवानग्या आणि ७० पैकी ६८ कामांच्या प्रशासकीय मंजुरी मिळविल्या बद्दल त्यांचे आमदार निलेश राणे यांनी पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अधिकारी विनायक औंधकर यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका संध्या तेरसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती नाडकर्णी यांनी केले.
या सोहळ्याला जि प उपाध्यक्ष दादा साईल, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, सभापती मिलींद नाईक, जि प सदस्य दीप्ती पडते, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गट नेता विलास कुडाळकर, संध्या तेरसे, काका कुडाळकर, संजय पडते, संजय वेंगुर्लेकर, विनायक राणे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी विनायक औंधकर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
