आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ न.प. ‘घंटा गाडी’ व ‘सक्शन व्हॅन’चे लोकार्पण…

⚡कुडाळ ता.२६-: आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आज नगरपंचायतीच्या नवीन घंटा गाडी सेवा आणि सक्शन व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नगरपंचायत जुन्या इमारतीचे सुशोभीकरण आणि जनरेटर सुविधेचेही उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कुडाळ शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी कुडाळ नगरपंचायतीने मोठे पाऊल उचलले आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन घंटा गाड्या आणि सांडपाणी उपशासाठी सक्शन व्हॅन नगरपंचायतीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आमदार निलेश राणे यांनी श्रीफळ वाढवून या वाहनांचा शुभारंभ केला. कुडाळ शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ही आधुनिक यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नगरपंचायत कार्यालयाच्या जुन्या इमारतीचे सुशोभीकरण आणि पहिल्या मजल्याचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. आमदारांनी या नूतनीकरण झालेल्या भागाची बारकाईने पाहणी केली. इमारतीला आलेले नवीन रूप पाहून त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. तसेच कार्यालयाचे कामकाज अखंडित सुरू राहण्यासाठी बसवण्यात आलेल्या जनरेटरचे देखील यावेळी लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्याला कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, निलेश परब, संध्या तेरसे, राकेश कांदे, संजय पडते, काका कुडाळकर यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.

You cannot copy content of this page