पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्या उदघाटन:ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांची माहिती..
⚡कुडाळ ता.२६-: महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ आणि २८ मार्चला कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2025 आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्याचबरोबर या दोन दिवसात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी दिली. कुडाळ येथे टोपीवाला वाचनालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कोमसाचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजन पांचाळ उपस्थित होते.
या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार नारायण राणे, जि प अध्यक्ष प्रमोद कामत, विधान परिषद सदस्य ॲड निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जि प उपाध्यक्ष तुकाराम साईल आणि कुडाळ नगराध्यक्ष सौ प्राजक्ता बांदेकर उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे तसेच जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सिंधुदुर्ग सचिन हजारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यानिमित्त २७ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडी होईल. ग्रंथदिंडी टोपीवाला वाचनालय येथून निघून ती महालक्ष्मी हॉलपर्यंत येईल. या ग्रंथ दिंडीचा शुभारंभ कुडाळचा नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता न्यू इंग्लिश स्कूल देवबाग येथील विद्यार्थी दशावतार नाट्य प्रयोग सादर करणार आहेत. दुपारी दोन वा कै गंगाराम गव्हाणकर यांच्या साहित्यावर चर्चा होणार असून या चर्चेत हेमंत पाटकर (कणकवली ) प्रसाद खडपकर (वेंगुर्ला ‘ ) प्रज्ञा चव्हाण ( देवगड ) सोनाली गोडे (कुडाळ ) हे सहभागी घेणार आहेत तर सायंकाळी तीन वा श्रुतिका या कार्यक्रमात कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल .वालावलकर, डॉ संजीव आकेरकर व श्रीमती वर्षा वैद्य या सहभागी होणार आहेत
२८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आनंदयात्रा हा कार्यक्रम असून प्रसाद कुलकर्णी हे सादरीकरण करणार आहेत तर दुपारी दोन वाजता वाचन संस्कृती वाढ होण्यासाठी ग्रंथपालांची भूमिका या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात संजय शिंदे ग्रंथपाल, पुनम नाईक ग्रंथपाल, अक्षता सावंत ग्रंथपाल, सिद्धेश राहुल ग्रंथपाल हे सहभाग घेणार आहेत. सायंकाळी तीन वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतायुषी ग्रंथालयांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये रा ब अनंत शिवाजी वाचनालय कुडाळ, श्रीराम वाचन मंदिर व क्रीडाभुवन सावंतवाडी, नगर वाचनालय वेंगुर्ला, रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय शिरोडा वेंगुर्ला, श्रीराम वाचनालय वेंगुर्ला, नट वाचनालय बांदा सावंतवाडी, नगर वाचन मंदिर मालवण, श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा मालवण, श्री शिवाजी वाचन मंदिर भरड मालवण, सौ मालती जनार्दन जोशी मोफत वाचनालय व डॉक्टर वि वा नेने ग्रंथालय वाडा देवगड या ग्रंथालयांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व ग्रंथालयीन कार्यकर्ते अनंत वैद्य, श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीचे कार्यवाह रमेश बोंद्रे आणि रा ब अनंत शिवाजी देसाई वाचनालय कुडाळचे अध्यक्ष अरविंद शिरसाठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सचिन हजारे यांनी दिली. या सिंधुदुग ग्रंथ महोत्सवाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
