नवीन सक्शन व्हेईकल प्राप्त
कणकवली : शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीला अत्याधुनिक सक्शन व्हेईकल प्राप्त झाले आहे. गटार, नाले तसेच सेप्टिक टँक साफसफाईसाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यदायी वातावरणाच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे.
यापूर्वी साफसफाईच्या कामांमध्ये अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः सांडपाणी व्यवस्थापनासाठी मनुष्यबळावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता या नवीन वाहनामुळे कामे जलद, सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने करता येणार आहेत.
नगरपंचायतीच्या या उपक्रमामुळे शहरातील साचलेले पाणी, गटारातील घाण आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार असून, स्वच्छ व निरोगी कणकवलीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, याबाबत ची माहिती कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली आहे.
