⚡मालवण ता.२५-:
मालवणचे ज्येष्ठ पत्रकार, देवबाग गावचे माजी सरपंच, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघांचे माजी जिल्हाध्यक्ष गजानन सीताराम वालावलकर (वय ७२) यांचे आज सकाळी मालवण येथील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.
देवबाग गावचे सुपुत्र असणारे गजानन वालावलकर यांनी ऐशीच्या दशकात आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. एक अभ्यासू पत्रकार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या गजानन वालावलकर यांचा अध्यात्मिक तसेच चरित्रलेखन करण्यात हातखंडा होता. त्यांनी साप्ताहिक जनयुग पासून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली.
१९८४ ते १९९२ या काळात त्यांनी देवबाग गावचे सरपंच पद भूषविले होते. सरपंच पदाच्या काळात देवबाग स्मशानभूमी, खाडी किनारी बंधारा, देवबागचां रस्ता या कामांबरोबरच गावच्या विकासाबाबत पुढाकार घेऊन कामे मार्गी लावली. वाचनाचे व्यासंगी असणारे गजानन वालावलकर हे जिल्हा ग्रंथालय संघांचे काही काळ जिल्हाध्यक्ष होते. तर मालवण नगरवाचन मंदिरचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. उत्कृष्ट वक्ता म्हणून वालावलकर यांच्याकडे पाहिले जायचे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंतयात्रा आज सायंकाळी ५ वा. साई समर्थ कॉम्पलेक्स, धुरीवाडा मालवण याठिकाणच्या निवासस्थानाकडून निघणार आहे.
