कणकवली : कणकवली रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आढळलेल्या एका व्यक्तीवर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बाबू ताजपारिया (वय ३९, सांताक्रुज, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार हृदयनाथ शिंदे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील ताजपारिया हा मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजल्यापासून बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कणकवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर फिरत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सकाळच्या सुमारास हवालदार शिंदे यांनी त्याची चौकशी केली.
चौकशीदरम्यान सुनील याने उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच विसंगत माहिती दिल्याचे समोर आले. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने हृदयनाथ शिंदे यांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
