⚡कणकवली ता.२४-: नांदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान वागदे डंगळवाडी येथे अज्ञात व्यक्तीकडून चारचाकी वाहनाचे तीन टायर जाळून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अडथळा निर्माण करण्यात आला. या कृत्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मानवी जीवितास धोका निर्माण झाला. गोपनीय मदतनिस सागर बाबुराव जाधव (कणकवली पोलीस ठाणे) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पेटवलेले टायर विझवून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. मात्र संबंधित अज्ञात इसम घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही.
याप्रकरणी सागर बाबुराव जाधव यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२६ (२), २८५, २८७, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण करत आहेत.
