⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील कोंडये वरचीवाडी येथे शेतमांगराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीच्या काजू बियांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर (वय ७६, व्यवसाय शेती, रा. कोंडये वरचीवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तेंडुलकर यांचे राहते घर कोंडये वरचीवाडी येथे असून ते आपल्या सख्ख्या भावासोबत विलास विठ्ठल तेंडुलकर (वय ६६) राहतात. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य जाणवली आदर्शनगर येथे वास्तव्यास आहेत. तेंडुलकर कुटुंबाची कोंडये गावातील गट क्रमांक ११ व ३९७ मध्ये सुमारे सव्वा सात एकर जमीन असून त्या ठिकाणी काजू, बांबू व मिरी लागवड करण्यात आलेली आहे. या बागेत साधारण १००० काजू झाडे असून शेती साहित्य साठवण्यासाठी चिरेबंदी व सिमेंट पत्र्याचे पक्के शेतमांगर बांधलेले आहे.
तेंडुलकर हे दररोज सकाळी ८.३० वाजता बागेत जाऊन कामगारांच्या मदतीने कामकाज करतात व संध्याकाळी घरी परततात. २२ मार्च रोजी ते व त्यांचा भाऊ विलास यांनी दिवसभर काजू बिया गोळा करून त्या शेतमांगरात सुरक्षित ठेवून कुलूप लावले होते.
मात्र, २३ मार्च रोजी सकाळी बागेत गेल्यानंतर शेतमांगराचे कुलूप तोडलेले आढळून आले. तसेच मांगराच्या पडवीत काजू बिया अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. मांगराच्या आत पाहणी केली असता २२ मार्च रोजी साठवून ठेवलेल्या काजू बियांपैकी मोठ्या प्रमाणात बिया चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या चोरीत सुमारे दोन टन वजनाच्या, प्रती किलो १६० रुपये किमतीच्या काजू बियांचा समावेश असून एकूण अंदाजे ३,२०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. ही चोरी २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० ते २३ मार्च रोजी सकाळी ८.३० या कालावधीत घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्यांनी शेतमांगराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून काजू बिया चोरून नेल्याची तक्रार तेंडुलकर यांनी दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर करत आहेत.
