⚡बांदा ता.०६-: इन्सुली परबवाडी येथे शनिवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हरी गजानन धुरी यांच्या घरावर माडाचे मोठे झाड कोसळून घराचे नुकसान झाले. या घटनेत घरातील काही सदस्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना उपचारासाठी तातडीने नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
या दुर्घटनेत घराच्या छपरासह अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. संबंधित महसूल प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा तसेच शासनाकडून धुरी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
इन्सुली परबवाडीत वादळी वाऱ्याचा तडाखा; घरावर माड कोसळून नुकसान…
