⚡सावंतवाडी ता.२३-: नगरपरिषदेच्या जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानातील खेळण्यांच्या दुरावस्थेचा फटका एका निष्पाप चिमुकलीला बसला आहे. तुटलेल्या घसरगुंडीचा पत्रा लागून ती चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अर्थसंकल्पात आर्थिक वर्षात उद्यान परिसर देखभालीसाठी ३५ लाखांची तरतूद करत चालूवर्षी तितकीच रक्कम खर्ची घालून घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रविवारी ती चिमुकली आपल्या पालकांसोबत उद्यानात खेळण्यासाठी गेली होती. यावेळी घसरगुंडीचा पत्रा तुटलेला असतानाही दुरूस्ती करण्यात न आल्याने खेळत असताना पत्रा चिमुकलीला लागला. यात ती जखमी झाली. उद्यानातील खेळण्यांच्या सुरक्षिततेबाबत विरोधी गटाचे नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी यापूर्वीच प्रश्न उपस्थित केला होता. तसेच उद्यानात येणाऱ्या नागरिकांनीही रितसर लेखी तक्रार प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल. चिमुकल्यांच्या सुरक्षितेपेक्षा इतर काम मुख्याधिकारी अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांना महत्त्वाची वाटल्याचा आरोप आता होत आहे. चिमुकलीच्या अपघाताला जबाबदार कोण ? असा सवालही नागरिकांतून विचारला जात आहे. शिव उद्यानात दररोज शेकडो मुलांसह नागरिक येत असतात. मात्र, नादुरुस्त झालेल्या खेळण्यांमुळे चिमुकलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे, लाखो रूपये उद्यान परिसर देखभालीसाठी खर्च होत आहेत. यंदाच्या २०२६-२७ साठीच्या अर्थसंकल्पात देखभालीसाठी ३५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीत ५८ हजार रूपये सार्वजनिक उद्यान खेळनी दुरूस्तीसाठी खर्ची घातलेत. तर आता अंदाजपत्रकात १ लाखांची तरतूद करण्यात आलेली असताना झालेला प्रकार बघता प्रशासनाने नेमकी दुरुस्ती कशाची केली ? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत विचारण्यासाठी मुख्याधिकारी यांना फोन केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
