साक्षी वंजारी यांची मागणी:आमदारांचे नाव अशा प्रकारे पुढे येणे ही मतदारसंघासाठी लज्जास्पद..
⚡सावंतवाडी, ता.२३-:
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे नाव समोर येत असल्याने व संबंधित फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे सावंतवाडीचे नाव राज्यभर चर्चेत आले असून ही बाब चिंतेची व लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून अशोक खरात याचे भोंदूगिरी, महिलांशी गैरवर्तन तसेच गरीबांच्या जमिनी बळकावल्याचे आरोप विविध व्हिडिओ आणि फोटोद्वारे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर काही वृत्तवाहिन्या व सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये आमदार दीपक केसरकर यांचे नाव देखील पुढे येत असल्याने सावंतवाडीकरांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात यावे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत आमदार दीपक केसरकर यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी वंजारी यांनी केली आहे. “२८८ आमदारांमध्ये सावंतवाडीच्या आमदारांचे नाव अशा प्रकारे पुढे येणे ही मतदारसंघासाठी लज्जास्पद बाब आहे,” असेही त्या म्हणाल्या.
यापूर्वीही आमदार केसरकर यांच्या बुवाबाजी संदर्भातील चर्चा स्थानिक पातळीवर होत असल्याचे सांगत, या प्रकरणामुळे त्या चर्चांना अधिक उधाण आले आहे. तसेच निधी वाटपाबाबतही प्रश्न उपस्थित करत, सावंतवाडीऐवजी इतर भागात निधी दिला जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करत, जर योग्य कारवाई झाली नाही तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही वंजारी यांनी दिला आहे.
