बांद्यात २३ मार्चला ‘सिंधु आरोग्य मेळावा…

⚡बांदा ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत सोमवार २३ मार्च रोजी बांदा येथे ‘सिंधु आरोग्य मेळावा” चे आयोजन करण्यात आले आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा संपन्न होईल.
या मेळाव्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी जि. प. उपाध्यक्ष तुकाराम साईल, सावंतवाडी पं. स. सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक उपस्थित राहणार आहेत.
​ ​या आरोग्य मेळाव्यात स्त्री रोग तज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, शल्यचिकित्सक आणि हृदयरोग तज्ञ तपासणी करणार आहेत. तसेच जनरल चेकअपसह ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर तपासणी, हिमोग्लोबिन, लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची प्राथमिक तपासणी होणार आहे.
या मेळाव्याचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर आणि गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. ​बांदा आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आरोग्याची मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page