कृष्णा करमळकर : पाडलोस शाळा नं. १ चा शतकमहोत्सव जल्लोषात प्रारंभ..
बांदा : प्रतिनिधी
पाडलोस गावातील शिक्षणाची मुहूर्तमेढ एका साध्या शेतमांगरातून रोवली गेली आणि पुढे याच बीजाचे भव्य वटवृक्षात रूपांतर झाले, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा (नाना) करमळकर यांनी केले.
भविष्यातील शिक्षणाची गरज ओळखून 18 मार्च 1926 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडलोस नं. 1 ची स्थापना करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ शाळेच्या शतकमहोत्सव सोहळ्याचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी करमळकर बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यास उपसरपंच राजू शेटकर, तुकाराम गावडे, देवस्थान मानकरी आनंद गावडे, पाडलोस गाव ग्रुप अध्यक्ष प्रणित गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, उपाध्यक्ष सुधीर गावडे, शाळा नं. 2 च्या अध्यक्ष मयुरी कुबल, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब, माजी उपसरपंच महादेव गावडे, शिक्षक अनिल वरक तसेच रामचंद्र गावडे, नाना गावडे, गोविंद माधव, बंडो माधव, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आली. शंभर वर्षांपासून गावोगावी ज्ञानाची गंगा पोहोचवणाऱ्या या शाळेने अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले असून, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विजय गावडे यांनी केले, तर प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर यांनी मांडले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे यांनी आभार मानले.
शतकमहोत्सवानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येणार असून, हा सोहळा गावासाठी अभिमानाचा ठरणार आहे असे माजी विद्यार्थी विश्राम गावडे यांनी सांगितले.
शिक्षणाच्या गुणवत्तेत प्रगती
त्या काळातील अडचणी व गावकऱ्यांची शिक्षणाविषयीची तळमळ अधोरेखित करण्यात आली. अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून सुरू झालेली ही शाळा आज आधुनिकतेकडे वाटचाल करत असून, शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने प्रगती करत आहे, असे तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब यांनी सांगितले.
