मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१८-: हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्याचे शास्त्रशुद्ध महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने मळगाव तेलीवाडी येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी येथील ‘दत्त प्रसाद स्वयंसाहाय्यता महिला समूहा’मध्ये ‘आदर्श गुढीपाडवा’ हा धार्मिक उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी ट्रस्टच्या कार्यकर्त्या सौ. पल्लवी पेडणेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गुढीपाडव्याला गुढी कशी उभारावी, तिची दिशा, पूजनाची पद्धत आणि त्यामागील आध्यात्मिक शास्त्र काय आहे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले. केवळ बाह्य सजावट न करता शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केल्यामुळे काय लाभ होतात, याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.
या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील २५ महिला व ग्रामस्थांनी घेतला. “ट्रस्टच्या या उपक्रमामुळे आम्हाला गुढीपूजनातील बारकावे समजले आणि यावर्षीचा पाडवा अधिक भक्तीभावाने साजरा करण्याची प्रेरणा मिळाली,” अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे मळगाव परिसरात कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page