⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१८-: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यांनी कणकवली येथील ABC (Animal Birth Control) केंद्राला सोमवार (दि १६ मार्च) रोजी भेट देऊन केंद्राच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान केंद्रातील विविध नोंदी, स्वच्छता व्यवस्था, कुत्र्यांच्या देखभालीची सुविधा तसेच शस्त्रक्रिया प्रक्रियेबाबत माहिती घेण्यात आली. पाहणीदरम्यान काही बाबींमध्ये त्रुटी आढळून आल्याने संबंधित यंत्रणेला कामकाज अधिक शिस्तबद्ध व नियमांनुसार करावे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTO WRIT PETITION (Civil) No(s). 5 of 2025 तसेच प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control) नियम, 2023 नुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत व नियमानुसार पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, नगर पालिका प्रशासन सह आयुक्त विनायक औंधकर, कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील, पशुसंवर्धन विभागाचे श्री बिलोलीकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान ABC केंद्राच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे का तसेच त्या समितीत प्राणीप्रेमींचा समावेश आहे का याबाबत माहिती घ्यावी. तसेच Dog Catching करून संबंधित कुत्र्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडल्याबाबत GPS फोटोसह नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रात येणाऱ्या प्रत्येक कुत्र्याचा स्वतंत्र केस पेपर ठेवणे, त्याच्या आहाराचे (Feeding) नियमित रेकॉर्ड ठेवणे तसेच कुत्र्यांना केंद्रात अनावश्यकपणे जास्त दिवस न ठेवता आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना संबंधित ठिकाणी सोडण्याबाबत विशेष भर देण्यात आला. ऑपरेशनपूर्वी कुत्र्यांना उपाशी ठेवणे तसेच शस्त्रक्रियेदरम्यान काढलेले अवयव स्वतंत्र बाटल्या किंवा पिशव्यांमध्ये फॉर्मालिनमध्ये जतन करून ठेवावे. तसेच कुत्र्यांच्या आहारासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा स्टॉक रजिस्टर ठेवणे, केंद्राला भेट देणाऱ्या प्रत्येक अधिकारी किंवा व्यक्तीची नोंद व्हिजिट रजिस्टरमध्ये करणे बंधनकारक आहे. केंद्र परिसर स्वच्छ, हवेशीर व नीटनेटका ठेवण्यावरही विशेष भर देण्यात आला. सर्व कुत्र्यांना सुरक्षित पिंजऱ्यात ठेवणे, तसेच गरोदर किंवा जखमी कुत्री पकडू नये. सर्व कुत्र्यांना आवश्यक ते लसीकरण केलेले असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कुत्र्यांचे लसीकरण झाल्यावर त्यांचे tagging करण्याबाबतदेखील सूचना देण्यात आल्या. तसेच पाळीव कुत्र्याना देखील वेळोवेळी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी केले.
०००००००
