अनिल निरवडेकर:तर राजवाड्यासमोर लवकरच खाऊ गल्ली सुरू होणार..
⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी शहरातील भुयारी गटार योजना पूर्णत्वास नेण्यासाठी कोल्हापूर येथील तज्ञांकडून अंदाजपत्रक (एस्टिमेट) तयार करून घेण्यात आले असून, लवकरच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी दिली. जनतेला दिलेली गॅरंटी पूर्ण करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या सर्वांगीण विकासावर आमचा भर असून, टीकाटिप्पणींकडे दुर्लक्ष करून पुढील पाच वर्षांत विकासकामे करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
नरेंद्र डोंगर परिसरात भव्य योगा व मेडिटेशन सेंटर उभारण्याचा मानस असून, त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तसेच राजवाड्यासमोर ‘खाऊ गल्ली’ उभारण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. शहरातील जिमखाना मैदानाला रणजी दर्जा मिळावा यासाठीही स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व महत्त्वाच्या विषयांवर आज बैठक घेण्यात आली असून, लवकरच हे प्रकल्प मार्गी लावले जातील, असेही निरवडेकर यांनी नमूद केले.
