ठाकरे शिवसेना पदाधिकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बसफेरी पूर्ववत..
⚡मालवण ता.१६-:
मालवण आगारातून देवबागकडे जाणारी बस प्रवासी कमी असल्याच्या कारणावरून रविवारी दुपारी अचानक रद्द करण्याची घोषणा मालवण आगारामार्फत करण्यात आल्याने बसची वाट पाहत बसलेल्या देवबाग येथील प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मालवण एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात प्रवाशांनी थेट ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यावर पदाधिकाऱ्यांनी एसटी प्रशासनाला खडे बोल सुनावल्यानंतर प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेली बसफेरी सोडण्यात आली होती.
मालवण बसस्थानकावर रविवारी दुपारी देवबाग गावात जाण्यासाठी प्रवासी थांबले होते. प्रवासी संख्या कमी असल्याने एसटी प्रशासनाकडून अचानक बसफेरी रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. एसटी प्रशासनाकडून अशाप्रकारे मनमानीपणा केला जात असल्याबद्दल प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली होती. याची माहिती थेट ठाकरे शिवसेना कार्यालयात प्रवासी वर्गाने दिली. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेले शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर व सिद्धेश मांजरेकर यांनी तात्काळ प्रवाशांसह डेपो कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना खड्या शब्दांत समज दिली. प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सांगत त्यांनी अचानक बस रद्द केल्याबाबत डेपो अधिकाऱ्यांना जाब विचारला. पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर रद्द करण्यात आलेली देवबाग बस फेरी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी देवबाग येथील प्रवाशांनी ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
जनतेच्या सवेसाठी एसटी सेवा असल्याने अचानक एसटी फेरी रद्द करणे म्हणजे मनमानीपणा आहे. एसटी प्रशासनाने एक दिवस अगोदर प्रवाशांना माहिती देणे आवश्यक आहे. आपल्या मर्जीप्रमाणे एसटी प्रशासन वागत असेल, तर आम्ही त्यांना जागा दाखवून देऊ. जनतेला एसटी सेवा नियमितपणे वेळेत मिळणे आवश्यक आहे. प्रवासी वर्गाला त्रास झाल्यास संपर्क साधावा, असे आवाहन बाबी जोगी यांनी केले.
