बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये “क्युरियस माइंड्स” विज्ञान प्रदर्शन…

विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी..

कुडाळ : येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी “क्युरियस माइंड्स : विज्ञान प्रदर्शन व सादरीकरण” या अंतर्गत शालेय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
हे प्रदर्शन २६ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी विज्ञान शिक्षक विश्वजीत डांगमोडेकर यांच्या पुढाकाराने, मुख्याध्यापिका सौ. चैताली बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमाच्या समन्वयासाठी ऋतूजा निब्रे यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि सादरीकरण कौशल्य विकसित करणे हा होता. प्रदर्शनात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांतील मॉडेल रिपोर्ट, माहितीपर रिपोर्ट आणि संशोधन आढावा अशा तीन गटांत प्रकल्प सादर करण्यात आले.
एकूण ८४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून सुमारे ७७ टक्के सहभागामुळे विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयाकडे असलेला उत्साह स्पष्टपणे दिसून आला. प्रकल्पांचे मूल्यमापन जीवशास्त्रासाठी चैताली बांदेकर व विश्वजीत डांगमोडे कर, रसायनशास्त्रासाठी मंदार जोशी आणि भौतिकशास्त्रासाठी प्राची परब यांनी केले. प्रकल्पाची गुणवत्ता, सादरीकरण, आत्मविश्वास, आवाजाची स्पष्टता व प्रश्नोत्तर सत्रातील कामगिरी या निकषांवर मूल्यांकन करण्यात आले.
या उपक्रमाला उपमुख्याध्यापिका प्रीती म्हाडदळकर, समन्वयक प्रिया केटगाळे तसेच सहकारी शिक्षक मधुरा इंसुलकर, प्राजक्ता जाधव, रोहिदास राणे, शमीका भिसे आणि साईश गणाचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सजावट व दस्तऐवजीकरणाची जबाबदारी पूर्णिमा शिरवलकर, अश्विनी परब आणि मयुरेश लाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाभिमुख शिक्षणाची आवड व वैज्ञानिक जिज्ञासा वाढीस लागली आहे. भविष्यात हा उपक्रम आंतरशालेय स्तरावर राबविण्याचा मानस प्रशालेने व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page