कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मणक्याची मोफत तपासणी शिबिर संपन्न…

१८० पेक्षा अधिक रुग्णांनी घेतला लाभ..

कणकवली : ग्रामीण भागातील रुग्णांच्या मणक्याशी संबंधित आजारांचे निदान व मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने ‘द स्पाईन फाउंडेशन, मुंबई’, कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि डॉक्टर फ्रायडे क्लब, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मणक्याची मोफत तपासणी शिबिर आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे संपन्न झाले. या शिबिरात १८० पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी करून उपचारांचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील पाठदुखी, मानदुखी, स्लिप डिस्क, सायटिका आदी मणक्याशी संबंधित विविध तक्रारी असलेल्या रुग्णांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग घेतला.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. प्रसिद्ध मणक्याचे तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज यांनी शिबिरात उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली तसेच पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन केले. डॉ. प्रणित पावसकर यांच्या मदतीने रुग्णांची तपासणी करण्यात आली.

शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना मणक्याच्या आजारांबाबत योग्य सल्ला आणि उपचारांची दिशा मिळाली. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिबिराच्या आयोजनासाठी डॉक्टर फ्रायडे क्लब, कणकवली तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. विशाल रेड्डी, डॉ. पंकज पाटील, अर्थोपेडिक तज्ञ डॉ. धनंजय रासम, डॉ. सर्वेश तायशेट्ये यांच्यासह विजय चौरे, अमोल माने, श्री. कदम, परशुराम आलव, वैद्यकीय कर्मचारी सोनिया तेली, कविता राऊळ, श्रीमती मसुरकर, श्री. नारकर यांच्यासह कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी या शिबिरात सेवा देण्यासाठी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page