मळेवाड येथील घटना:तत्काळ घटनास्थळी दाखल होत चिरेखाणीतील गर्भवती मातेचे वाचवले प्राण..
⚡सावंतवाडी ता.०७-: आजगाव मळेवाड सीमेवरील एका भागात माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना घडली.दुर्गम भाग, रस्ता नसलेले जंगल आणि रात्रीचे १० वा.चा सुमार.त्यात वेळेचे आणि खडतर प्रवासाचे आव्हान! अशा कठीण परिस्थितीत मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ रुग्णवाहिकेचे चालक शंकर पार्सेकर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे, एका ८ महिन्यांच्या गर्भवती मातेचे आणि तिच्या बाळाचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या ‘देवदूत’ रुपी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मळेवाड आजगाव सीमेजवळ राजगड जवळील चिरेखाणीवर काम करणाऱ्या एका कामगाराची पत्नी, जी ८ महिन्यांची गर्भवती आहे, ती अचानक बेशुद्ध पडली मात्र खाण परिसर जंगलात आणि दुर्गम भागात असल्याने तिथे जाणे म्हणजे अगदी जिगरीचेच.साध्या वाहनांना जाणेही कठीण होते. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच १०२ रुग्णवाहिकेचे चालक शंकर पार्सेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
जंगलमय भागातून वाट काढत वेळेवर उपचार व्हावे यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेत ,अगदी
चिरेखाणीकडे जाण्यासाठी सुस्थितीत रस्ता नसतानाही, पार्सेकर यांनी कौशल्याने रुग्णवाहिका थेट संबंधित महिलेपर्यंत पोहोचवली. संबंधित महिला बेशुद्ध असल्याने तिची प्रकृती अधिकच चिंताजनक होती. पार्सेकर यांनी तात्काळ तिला रुग्णवाहिकेत घेऊन ऑक्सिजन लावून लवकरात लवकर मळेवाड आरोग्य केंद्रात दाखल केले.
यावेळी आरोग्य केंद्रात तातडीने या महिलेवर उपचार वैद्यकीय पथकाचे अधिकारी डॉ विक्रम मस्के आणि डॉ अदिती ठाकर यांनी महिलेवर उपचार सुरू केले. योग्य वेळी ऑक्सिजन मिळाल्याने आणि वेळेत उपचार सुरू झाल्याने या मातेची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते.
वेळेचे महत्त्व ओळखून कठीण परिस्थितीत धाडस दाखवणाऱ्या शंकर पार्सेकर या रुग्णवाहिका चालकाच्या या कामगिरीमुळे या मातेला तत्काळ वैद्यकीय सेवा मिळाली . आरोग्य विभागाच्या या सतर्कतेबद्दल स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
