नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
⚡मालवण ता.०६-:
मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. मालवण नगरपरिषद हद्दीतील मामा वरेरकर नाट्यगृह हे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. नाट्यगृहाची इमारत जुनी झाल्यामुळे खुर्च्या, रंगकाम, विद्युत व्यवस्था, बसण्याची व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधा दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर आवश्यक दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, हे काम तातडीने करणे आवश्यक आहे. सदर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नाट्यगृहाची सुरक्षितता व उपयुक्तता वाढेल तसेच नागरिकांना व विविध सांस्कृतिक संस्थांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील. तरी मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दुरुस्ती साठी एक कोटी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी सांगितले.
