सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ला तीन वर्षे मुदतवाढ…

आ. दीपक केसरकर यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार..

⚡वेंगुर्ला ता.०६-: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी “सिंधुरत्न समृद्ध योजना” या योजनेची तीन वर्षांची मुदत मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली होती. या योजनेला पुढील मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून आग्रहाची मागणी केली होती.
दरम्यान राज्याच्या शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात “सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0” पुढील तीन वर्षांसाठी राबविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली असून या योजनेला अधिकृत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार असून विविध पायाभूत सुविधा, पर्यटन, शेती व मत्स्य व्यवसाय क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत आमदार दिपक केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 च्या माध्यमातून कोकणातील दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल आणि स्थानिक नागरिकांच्या प्रगतीसाठी नवे मार्ग खुले होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page