अपारंपरिक ऊर्जा मंत्री सावे यांनी माजी आमदार भाई गिरकर यांची माहिती..
⚡देवगड ता.०६-:
तालुक्यातील गिर्ये गावातील जुन्या पवनऊर्जा प्रकल्पच्या ठिकाणी नव्याने पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे व याच प्रकल्पच्या उर्वरित जागेत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. हे दोन्ही संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबतचा निर्णय झाला असून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे अपारंपारिक मंत्री अतुल सावे यांनी माजी समाजकल्याण मंत्री, माजी आमदार विजय उर्फ भाई गिरकर यांना पत्र पाठवून दिली आहे.
माजी मंत्री श्री गिरकर यांनी 10 मार्च 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन देवगड तालुक्यातील गिर्ये पवन ऊर्जा प्रकल्पच्या जागी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करावा अशी मागणी केली होती. या निवेदनानुसार राज्याचे अपारंपारिक मंत्री अतुल सावे यांनी देवगड तालुक्यातील गाव गिर्ये येथील भूमापन क्रमांक 136 व 131 मधील महाऊर्जाच्या मालकीची एकूण सुमारे 47.60 हेक्टर जमीन असून या जमिनीवर केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्याने १.५० मेगा वॅटक्षमतेचा पथदर्शी पवनऊर्जा प्रकल्प 14 जुलै 1994 रोजी कार्यान्वित करण्यात आला होता. या प्रकल्पाचे आयुष्य संपल्याने MNRE यांचे मान्यतेने प्रकल्पचे जानेवारी 2021 मध्ये निर्लेखन करण्यात आले.
महाऊर्जा कार्यालयाने गिर्ये येथील जागेवर एनर्जी स्टोरेज सहित पवन सौर संकरीत प्रकल्प उभारणीसाठी मे. पनामा इंटर्नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबिलिटी अँड स्किल डेव्हलपमेंट, पुणे या संस्थेमार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून पुढील कार्यवाही सुरू आहे.अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण – २०२० च्या अनुषंगाने राज्यातील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) मार्फत हा प्रकल्प विकसित करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आणि महानिर्मिती यांच्यात १४ जून २०२३ रोजी सामंजस्य करार करण्यात आलेला असून संयुक्त प्रकल्प उभारणीबाबत प्रस्तावित कार्यवाही सुरू आहे.
दोन्ही प्रकल्पसाठी जागा समुद्रालगत उपलब्ध असल्याने व देवगड बंदर जवळ असल्याने हरित ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारणी करण्याच्या दृष्टीने संबंधित प्रकल्प राबविण्याचा विचार करण्यात येत आहे.
